सामाजिक कार्यकर्त्या बहिणीने दिली रक्षाबंधनाची अनोखी भेट
पुणे : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, जिव्हाळा व नात्याचे अतूट बंधन असलेला सण. पिंपळे गुरव येथील सामाजिक कार्यकर्त्या आदिती निकम यांनी ह्या वर्षी अपघातात डावा पाय गमावलेल्या एका तरुणाला कृत्रिम जयपूर फूट (पाय) देऊन रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. या भेटीमुळे दुसऱ्याचा आधार घेऊन चालणाऱ्या या तरुणाच्या डोळ्यांतून अश्रू आले. नात्यातील परोपकार व प्रेम जपल्यास ती रक्ताचीच असणे गरजेचे नसते याची प्रचिती आली.
विनायक विलास पाटील (बणणजगोळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर, सध्या राहणार रहाटणी) या तरुणाचा २७ एप्रिल २०२१ रोजी गावाकडून दुचाकीवरून पुण्याकडे येताना अपघात झाला. या अपघातात त्याला डावा पाय गुडघ्यापासून गमवावा लागला. विनायक पाटील याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून, सध्या ते मोठ्या भावासह भाड्याने राहतो. मोठा भाऊ कारचालक असून विनायक खासगी नोकरी करायचा. मात्र, अपघातात पाय गमावल्यानंतर त्याच्या कामावर मर्यादा आल्याने तो आता गोळ्या, बिस्किटांसह पानटपरी चालवत आहे.
सध्याच्या कोरोना काळामुळे टपरी व्यवसायावरही मर्यादा आल्या. काही दिवसांपूर्वी पिंपळे गुरव येथील आदिती निकम यांच्याशी विनायकची भेट झाली. त्यांनी त्याला कृत्रिम पायाची संकल्पना समजावून सांगितली. त्यानंतर आदिती निकम यांनी पुढाकार घेऊन विनायकला आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भारत विकास परिषद या संस्थेकडून जयपूर फूट हा कृत्रिम पाय बसवून विनायकला रक्षाबंधन दिवशी अनोखी भेट दिली. नेमकी रक्षाबंधनाच्या दिवशीच ही भेट मिळाल्याने विनायकच्या डोळ्यांतून अश्रू आले.
आदिती यांनी रक्षाबंधन दिवशी अनोखी भेट दिली. ही भेट पाहून डोळ्यांत अश्रू आले. या कृत्रिम पायामुळे सध्या आधाराविना चालण्याचे बळ मिळत आहे.
